Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Samuel 22 >> 

1शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून देवाने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले.

2परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार

3तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.

4त्यांनी माझी चेष्टा केली पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.

5शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.

6अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.

7तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.

8तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला कारण देवाचा कोप झाला होता.

9त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.

10आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला.

11करुबावर आरुढ होऊन तो उडत होता वाऱ्यावर स्वार झाला होता.

12परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.

13त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की निखारे धगधगू लागले.

14परमेश्वर आकाशातून गरजला त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला.

15त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले

16परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे म्हटले समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.

17मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला. मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.

18शत्रू मला वरचढ होता त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता पण परमेश्वराने मला वाचवले.

19मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण देवाने मला आधार दिला.

20परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.

21मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.

22कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.

23परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.

24माझे आचरण शुध्द आणि निर्दोष आहे.

25तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.

26एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करु. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.

27हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटीलांशी तूही कुटिलतेने वागतोस.

28परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस

29परमेश्वरा, तू माझा दीप आहेस माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस

30परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो. देवाच्या मदतीनेचमी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.

31देवाची सत्ता सर्वंकष आहे. देवाचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या ,सर्वांची तो ढाल आहे.

32या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?

33देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो.

34देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो उच्च स्थानावर तो मला अढक ठेवतो.

35युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.

36देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.

37माझ्या पायांत बळ दे म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.

38शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.

39त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.

40देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.

41त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणजे मी त्यांच्यावर वार करु शकेन.

42शत्रू मदतीसाठी याचना करु लागले पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी देवाचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.

43माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.

44माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.

45आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.

46भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.

47परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.

48त्यानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांना माझ्या शासनामध्ये ठेवले.

49देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.

50म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.

51परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Samuel 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran