Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Samuel 2 >> 

1मग दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”

2तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका.

3दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांनाही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या गावांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.

4यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्याला म्हणाले, याबेश गिलादच्या लोकांनी शौलाला पुरले.

5तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.

6देव तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे.

7आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.”

8नेरचा मुलगा अबनेर हा शौलचा सेनापती होता. इकडे तो शौलचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.

9आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामी आणि सर्व इस्राएलयांच्यावर राजा म्हणून नेमले.

10हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता.

11दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदांच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.

12नेराचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले.

13सरुवेचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.

14अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”

15तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने लढायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.

16प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरुन त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच धारदार सुऱ्यांचे क्षेत्र असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे.

17त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.

18यवाब, अबीशय आणि असाएल हे सरूवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता.

19त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने डावीउजवीकडे वळून देखील पाहिले नाही.

20अबनेरने मागे वळून विचारले, तू असाएल ना?

21असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे. पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.

22पुन्हा अबनेर त्याला म्हणाला, हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.

23तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घूसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले.

24पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.

25बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.

26तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्याला विचारले, आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परीणाम दुःखच होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांना सांग.

27तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते.

28आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलांशी युध्दही केले नाही.

29अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी मग रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करून महनाइमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.

30यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांना त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरुन दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्याला आढळून आले.

31पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.

32दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करून उजाडता हेब्रोन येथे पोचली. े


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Samuel 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran