Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Corinthians 4 >> 

1म्हणून, आमच्यावर दया झाल्यामुळे, ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.

2आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.

3पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे.

4जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.

5कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.

6कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.

7पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, ह्याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.

8आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही.

9आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.

10आम्ही निरंतर आमच्या शरिरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरिरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.

11कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.

12म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते.

13मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे.

14कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हाला तुमच्याबरोबरच सादर करील.

15सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.

16म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.

17कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.

18आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही, पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो. कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Corinthians 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran