Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Corinthians 6 >> 

1जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्याबरोबर वाद असेल, तर तो वाद पवित्र जनांपुढे जाण्याऐवजी ती व्यक्ती तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करते?

2पवित्रजन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहित नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर क्षुल्लक, बाबींचा तुम्ही निर्णय करू शकत नाही काय?

3आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही?

4म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हाला निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गणती नाही, अशा माणसांना न्याय ठरविण्यास का बसवता?

5तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय?

6पण एक भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे?

7तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही?

8उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता.

9अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,

10चोर, लोभी किंवा दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे, ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाहीत.

11आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.

12"सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत", पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात; "सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत", पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही.

13'' अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे"; पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण जारकर्मासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे.

14आणि देवाने प्रभूला उठवले, आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुध्दा उठवील.

15तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो.

16तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील.

17पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो.

18जारकर्मापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते, पण जारकर्म करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुध्द पाप करतो.

19किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?

20कारण तुम्हाला मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Corinthians 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran