Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Corinthians 4 >> 

1आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.

2जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.

3पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचादेखील न्याय करीत नाही.

4कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही. पण त्यामुळे मी निर्दोष ठरत नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.

5म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.

6आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये.

7कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे?आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?

8तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हाला असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्हीहि तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.

9कारण मला वाटते की देवाने आम्हाला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जणू तमाशा असे झालो आहोत.

10आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!

11अगदी या क्षणापर्यंत आम्ही भूकेले आणि तहानलेले, उघडे आहो, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.

12आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.

13जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.

14मी तुम्हाला हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हाला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतो,

15कारण जरी तुम्हाला खिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगे मी तुम्हाला जन्म दिला आहे,

16यास्तव मी तुम्हाला बोध करतो की, माझे अनुकरण करा.

17यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करून देईल.

18पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.

19तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहिन.

20कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.

21तुम्हाला कोणते पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हाला शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे की, प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Corinthians 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran