Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Corinthians 12 >> 

1बंधूनो आत्मिक दानांविषयी, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.

2जेव्हा तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे चालविले जात होता तसे तुम्ही ह्या मुक्या* मूर्तींकडे नेले जात होता.हे तुम्हाला ठाऊक आहे.

3म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभू आहे, ” असे म्हणू शकत नाही.

4आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.

5तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.

6आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे.

7पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे.

8कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.

9दुसर्‍याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने,

10आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती, व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे.

11पण ह्या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.

12कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात, आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.

13कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच आत्म्याने प्यायला दिले.

14कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.

15जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.

16आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.

17सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते?

18पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे.

19ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?

20पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत,

21आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही’.

22तर उलट, शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत.

23आणि शरीराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो, आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते.

24कारण आपल्या शोभून दिसणार्‍या अवयवांना गरज नाही; पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळविले आहे.

25म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.

26आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.

27आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात.

28आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.

29सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय?

30सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय?

31पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा; आणि शिवाय, मी तुम्हाला एक अधिक चांगला मार्ग दाखवतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Corinthians 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran