Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Zechariah 8 >> 

1सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले.

2सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेसाठी खूप ईर्ष्यावान झालो आहे. तिच्या करीता क्रोधाने व आवेशाने ईर्ष्यावान झालो आहे.”

3सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोेनेत परत आलो आहे आणि यरुशलेमेत राहील. यरुशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”

4सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्री आणि वृध्द पुरुष यरुशलेमच्या रस्त्यावर पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालतांना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल.

5रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी गजबजून जाईल.

6सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात ह्या अवशिष्ट देशाला आश्चर्य वाटेल, म्हणून मलाही आश्चर्य वाटेल का?” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

7सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांतून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन.

8मी त्यांना घेउन येईन आणि ते यरुशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल.”

9सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “आपले हात दृढ करा! सेनाधीश परमेश्वराने मंदिराच्या पुननिर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.

10त्या दिवसापूर्वी, लोकास काम मिळत नसे वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नसे. जाणे येणे शत्रूंमुळे सूरक्षित नव्हते. मी प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याविरुध्द भडकविले होते.

11पण आता तसे पूर्वीच्या दिवसा सारखे नसेल. मी उर्वरित लोकांबरोबर असणार.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

12“ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी ह्या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांना वतन देईल.

13शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशिर्वादीत बनतील तेव्हा घाबरु नका! तूमचे हात दृढ ठेवा!”

14सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.

15“पण आता मात्र माझे मन:परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरुशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!

16पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.

17आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी शपथ देण्याची आवड धरू नका. कारण या गोष्टींचा मला द्वेष आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.

18सेनाधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले.

19सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”

20सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरुशलेमेला येतील.

21निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्याला शोधू.’ मीही येतो.”

22पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरुशलेमेत येतील.

23सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दहा लोक यहूदाकडे येऊन त्याचा झगा पकडून त्याला विचारतील, ‘देव तुम्हाबरोबर आहे’ असे आम्ही ऐकले आहे! आम्ही तुम्हाबरोबर येतो.”



 <<  Zechariah 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran