Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  John 3 >> 

1परूश्यांपैकी निकेदम नावाचा एक मनुष्य होता, तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.

2तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरूजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”

3येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”

4निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?”

5येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.

6देहापासून जन्मलेले देह आहेत, आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत.

7तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुम्हाला सांगितले ह्याचे आश्चर्य मानू नका.

8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”

9निकदेमाने त्याला उत्तर देऊन म्हटले, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?”

10येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाही काय?

11मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.

12मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?

13स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.

14जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाहि उंच केले पाहिजे,

15ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”

16कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.

17कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.

18जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.

19आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;

20कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा व्देष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येउ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.

21पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.

22ह्यानंतर येशू व त्याचे शिष्य यहुदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.

23आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत असत.

24कारण तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.

25मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुध्दीकरणाविषयी वादविवाद झाला.

26ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”

27योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.

28मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.

29वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलने जो एेकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.

30त्याची वृध्दी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.

31जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.

32जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो, आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.

33ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ ह्यावर आपला शिक्का लावला आहे.

34कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.

35पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्याहाती दिले आहे.

36जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे एेकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.



 <<  John 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran