Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 John 3 >> 

1आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच! ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले नाही.

2प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे अाम्हाला माहीत नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.

3आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो

4प्रत्येक जण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो. कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे.

5तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही.

6जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्याला पाहिले नाही, आणि त्याला तो ओळखलेही नाही.

7प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराहि न्यायसंपन्न आहे.

8जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.

9जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. कारण त्याचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही. कारण तो देवापासून जन्मला आहे.

10ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोहि नाही.

11आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे.

12काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्यांच्या भावाची कृत्ये नीतीची होती.

13बंधूनो, जर जग तुमचा व्देष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका.

14आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो.

15जो कोणी आपल्या भावाचा व्देष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की, खुनी माणसाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही.

16ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.

17जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो?

18प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.

19यावरुन आपण आेळखू की आपण सत्याचे अाहो, व त्याच्यासमोर आपल्या अंतःकरणाला धैर्य देऊ,

20कारण जर आपले अंतःकरण आपल्याला दोषी ठरवते, तर आपल्या अंतःकरणापेक्षा देव थोर आहे, आणि तो सर्वकाही जाणतो

21प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हाला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हाला धैर्य आहे.

22आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे आवडते ते करतो.

23तो आम्हाला अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.

24जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो.आणि त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो.



 <<  1 John 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran